
मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत गुरुवार दि. २५, शुक्रवार दि. २६, शनिवार दि. २७ आणि सोमवार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे महिलांच्या न्याय, सन्मान आणि सुरक्षेसाठी कार्य करणारे वैधानिक मंडळ आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेला हा आयोग महिलांची समाजातील स्थिती व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांवर प्रतिबंध करण्यासाठी, तसेच महिला व बालकांसाठीच्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. गरजू महिलांना समुपदेशन व नि:शुल्क कायदेशीर मदत पुरवणे हेही आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे.
त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी आयोगाची कार्यपद्धती, विविध उपक्रम तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोगामार्फत उचलण्यात आलेली धोरणात्मक पावले याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/
